राजमुद्रा : कथीत खिचडी घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांना धक्का बसला आहे. याप्रकरणी पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश ए.सी. डागा यांनी त्यांचा जामीन नाकारला आहे. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर ठाकरें गटाला धक्का बसला आहे.
कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांना अटक केली असून 17 जानेवारी 2024 पासून सूरज चव्हाण तुरुंगात आहेत. प्रत्येक पॅकेटमध्ये कमी खिचडी भरल्याचे पुरावे जरी नसले तरी कंत्राट मिळवताना पालिकेची फसवणूक केल्याचं स्पष्ट आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. तसेच आरोपीचा हे कंत्राट मिळवताना पहिल्यापासून शेवटपर्यंत सहभाग असल्याचे पुरावे असल्याचंही कोर्टाने मान्य केलं आहे. त्यामुळे आता मुंबई सत्र न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
याआधी याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांची चौकशी केली होती. त्यानंतर सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली. आया प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडे असून अमोल कीर्तीकर यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.आता सूरज चव्हाण यांचा जामीन अर्ज फेटाळून ठाकरे गटाला मुंबई सत्र न्यायालयाने धक्का दिला आहे