राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांनी जोरदार तयारी केली असून त्यांच्या जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाचा तिढा लवकर सुटणार आहे. या मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गट 20, काँग्रेस 18, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 7 जागांवर आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस उच्चभ्रू मतदारसंघ असलेल्या मलबार हिलसाठी देखील आग्रही आहे. त्यामुळे मतदार राजा यंदा कोणाच्या पारड्यात सत्ता देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
आगामी होणाऱ्या विधानसभेसाठी काँग्रेस मुंबईतील 18 जागेवर आग्रही असून यामध्ये 1) धारावी 2) चांदिवली 3) मुंबादेवी 4) मालाड पश्चिम 5) सायन कोळीवाडा 6) कुलाबा 7) कांदिवली पूर्व 8) अंधेरी पश्चिम 9) वर्सोवा 10) वांद्रे पश्चिम 11) घाटकोपर पश्चिम 12) कुर्ला 13) भायखळा 14) जोगेश्वरी पूर्व 15) मलबार हील 16) माहीम 17) बोरीवली 18) चारकोप यांचा समावेश आहे. आता या जागा काँग्रेसला सुटणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. यावेळी भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी एकसंघ शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती. आता या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना दुसरीकडे पक्षातील नेत्यांचे -आमदारांचे इनकमिंग आणि आउटगोइंग ही सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या मोर्चे बांधणीला ही वेग आला आहे.