राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून या निवडणुकीआधीच राज्य सरकारकडून विधानसभेच्या महामंडळाचे वाटप करण्यात आला आहे. यामध्ये आतापर्यंत केवळ तीन नेत्यांची नावे समोर आली आहेत. हे तीनही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde )यांच्या शिवसेनेचे आहेत. वाटप झालेल्या महामंडळात अद्याप भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील कुणाचंही नाव समोर आलेलं नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे.
विधानसभेसाठी राज्य सरकारने शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. संजय शिरसाट गेल्या अडीच वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत होते. यांची शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या अर्थात सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलेले नांदेडचे माजी खासदार हेमंत पाटील यांनादेखील महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. हेमंत पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
येत्या नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभेची निवडणूक होणे अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्री म्हणाल्याची माहिती आहे. याचाच अर्थ निवडणुकीला केवळ दोन महिने शिल्लक आहेत. असं असताना आता राज्य सरकारने शिवसेनेच्या मंत्रिपदाची वाट पाहणाऱ्या बड्या नेत्यांना मोठी जबाबदारी दिली आहे