राजमुद्रा : आगामी विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar )मैदानात उतरले आहेत. त्यांनी या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढण्याचा सपाटा लावला आहे. धुळे दौऱ्यावर असताना त्यांच्या स्वागताला भाजप आमदार अमरीश पटेल आल्याने ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे चर्चाना उधाण आलं आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्हा कधी-काळी काँग्रेसचा गड होता. 2019 च्या तोंडावर आधी नंदुरबारचं गावित कुटुंब त्यानंतर शिरपूरच्या अमरिश पटेलांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपात जाणं पसंत केलं. यावेळी अमरिश पटेलांनी पवारांच्या स्वागताबद्दल खुलासा केला असला तरी आपल्याला शरद पवारांनीच राजकारणात संधी दिली, असं सांगून त्यांनी संकेत दिल्याचीही चर्चा आहे. आता शरद पवार धुळ्यात आले असता अमरीश पटेल यांनी त्यांचे स्वागत केल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रचाराची सुरुवात केली असली तरी मुख्यमंत्री हा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रतिष्ठेचा केल्याचं दिसतं आहे.मुख्यमंत्रीपदाचा कुणीही चेहरा नसेल, अशी भूमिका काँग्रेस आणि शरद पवार गटाची आहे. मात्र दुसरीकडे जाहीर सभांमधून संजय राऊत मुख्यमंत्री ठाकरेंच्या नावावर कायम आहेत.
दरम्यान लोकसभेत महाविकास आघाडीने बाजी मारून महायुतीला चांगला धक्का दिला होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडूनही शर्तीची प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे या निवडणुकीत बाजी कोण मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.