राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) लढवण्याची घोषणा केली होती. त्यांनतर काल त्यांनी काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला. यावरून भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी संजय पांडे यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे..संजय पांडे हे सुपारी बहाद्दर अधिकारी होते. भाजप नेत्यांवर कारवाईसाठीच महाविकास आघाडीने संजय पांडे यांची नियुक्ती केली, असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यांच्या या टिकेला काँग्रेस आणि संजय पांडे काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वेध लागले आहेत. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामना रंगणार आहे. दररोज नवनवीन इच्छुक उमेदवारांची नावे समोर येत असून माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशानंतर भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे.भाजपचे मोहित कंबोज यांनी एक्स या समाज माध्यमावर ट्विट करत संजय पांडे यांच्यावर निशाणा साधला आहे. 2022 चा हिशेब 2024 मध्ये पूर्ण करू, असे आव्हानच त्यांनी संजय पांडे यांना दिले आहे.
दरम्यान काल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर संजय पांडे म्हणाले की, मी विधानसभा निवडणूक लढवणार हे नक्की आहे. या संदर्भात पक्ष निर्णय घेईल..जागावाटपानंतर कोणत्या ठिकाणाहून लढायचं ते ठरवू, असे त्यांनी म्हटले आहे.