राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून विविध जागांवर दावेदारी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावर (Nashik Central Assembly Constituency) दावा केला. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी (Sanjay Shirsat )थेट उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. आता या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. नाशिकच्या सर्व जागावर आमची लढण्याची तयारी असल्याचा दावा शिवसेनेनंतर आता भाजपने केला आहे. त्यामुळे ही जागा आता कोणाला सुटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. अजय बोरस्ते आमच्यासोबत विधानसभेत दिसतील, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या दौऱ्यानंतर भाजपने शिंदे शिवसेनेला चांगलाच इशारा दिला आहे.या मतदारसंघात वर्षानुवर्ष आमचे कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळे आमची सर्वच जागांवर निवडणूक लढण्याची तयारी असल्याचा दावा भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी केला आहे.
शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी नाशिक जिल्ह्यातील सात जागांवर लढण्याची तयारी असल्याचा दावा करत वादाला आणखी फोडणी दिल्यानं दोन्ही पक्षातील संघर्ष वाढला आहे. मुंबईत जागा वाटपाच्या चर्चा होत असताना नाशिकमध्ये मात्र दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देत असल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामना रंगणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपावरून चर्चा सुरु आहे