राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार गटाला नवीन चिन्ह द्या अशी मागणी केली आहे.. या नवीन घडामोडीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतचे प्रकरण शरद पवार यांच्या पक्षाकडून शुक्रवारी सुप्रीम कोर्टासमोर आणण्यात आले. हे प्रकरण लवकर ऐकण्याची विनंती शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. या प्रकरणावर २५ सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्ट नक्की सुनावणी कधी घेणार हे आज येणाऱ्या कोर्टाच्या प्रकरण यादीवरुन स्पष्ट होणार आहे.दरम्यान विधानसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता पुढील महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापूर्वी अजित पवार गटाला नवीन चिन्ह द्या अशी विनंती शरद पवार गटाने केली आहे. यावर आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाला अपक्षांचा मोठा फटका बसला होता. शरद पवार गटाला निवडणुकीत तुतारी हे चिन्ह मिळाले होते. तर काही अपक्षांना तुतारी सदृश्य ट्रंपेट हे चिन्ह मिळाले होते. त्यामुळे मतदारांचा गोंधळ होऊन पवार गटाची मते अपक्षांना मिळाली याचा फटका तुमच्या गटाला बसल्याचा दावाही शरद पवार गटाने यापूर्वी केला होता. दरम्यान आता लवकरात लवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाची सुनावणी व्हावी अशी विनंती सुप्रीम कोर्टाकडे शरद पवार गटाने केली आहे.