राजमुद्रा : आगामी विधानसभेच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी केली असून भाजपने विदर्भासह मराठवाड्यातील विधानसभेच्या जागा जिंकण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची रात्री उशिरापर्यंत खलबत्त सुरु होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. या बैठकीत भाजपने 155-160 जागा लढवाव्यात आणि उर्वरीत जागा मित्रपक्षांनी लढवाव्यात अशी रणनीती आखल्याची माहिती समोर येत आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने 155 जागावर दावा केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाच्या वाट्याला 133 जागा येतील. भाजप जितक्या कमी जागा लढेल, तेवढा मित्रपक्षांचा फायदा असू शकतो.दरम्यान ठाकरे गट आणि दादा गटाचे मिळून एकूण 94 आमदार आहेत. यामध्ये आता 133 जागांमधून 94 जागा जाता 39 जागांवर मित्रपक्षांना जागा वाटपाचे सूत्र ठरवावे लागेल. शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांच्यात बैठक होऊन यावर तोडगा काढण्यात येईल. मित्र पक्षांपैकी दादा गट आणि शिंदे गट किती जागा लढणार हे ठरले नाही. निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
.लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह (Amit Shah) यांनी बुधवारी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमधील भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. यावेळी अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीत आपले प्रमुख उद्दिष्ट हे शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांना रोखणे, हेच असेल असे सांगितले.. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेत असल्याची सूत्रांची माहिती आहे