राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते ही जोमाने तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवरच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले असून आज पासून दोन दिवस ते विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यावेळी ते विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्हाचा आढावा घेणार आहेत.
तर 28 तारखेला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर जिल्हाचा आढावा घेण्यात येणार आहे. विधानसभेला राज्यातील प्रमुख पक्षांची दोन युती आणि तिसरी नवीन निर्माण झालेल्या युतीला लढा देण्यासाठी मनसेकडून पूर्ण तयारी केली जात आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वीच विधानसभा निवडणूकीसाठी सात उमेदवार जाहीर केले आहेत. आता या विदर्भ दौऱ्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.
राज्यामध्ये बंडाचे राजकारण झाल्यानंतर मनसेची पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. जवळ जवळ सर्वच प्रमुख पक्ष फुटल्यानंतर आता मनसेकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढत आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभेमध्ये मनसे महत्त्वाची भूमिका बजावणार असून ही निवडणूक जोरदार रंगणार आहे.. विधानसभेपूर्वीचा राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा होत असून याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे..