राजमुद्रा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना घडत असून यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची घोषणा केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ति अभियान सुरू करणार असून त्यामध्ये पंचशक्ती असेल असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान मुलांकडून होणारा पाठलाग, छेडछाड, निनावी फोनकॉल असा त्रास काही महिलांना, मुलींना होतो, मात्र त्याबाबत मनमोकळेपणे बोलता येत नाही . तक्रार करण्यास भीती वाटते. त्यांनी आपली तक्रार मांडावी यासाठी परिसरातील शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालय, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल , एसटी स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्यूशन , महिला वसतीगृह,पोस्ट ऑफीस या ठिकाणी पोलिसांमार्फत शक्ति बॉक्स – ही तक्रार पेटी ठेवण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. याबाबतची गोपनीय माहिती तक्रार पेटीत टाकल्यानंतर पोलिसामार्फत सदरपेटी दोन ते तीन दिवसात उघडून त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच तक्रार करण्याचे नाव गोपनीय ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.
महिला व मुलींच्या बाबतीत मधल्या काळात अनेक अतिशय दुर्दैवी घटना घडल्या मात्र कोणत्याही परिस्थिती मध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी तातडीने काही पावलं उचलण्याची गरज आहे. त्यासाठी ‘शक्ति अभियान’ सुरू करण्यात येणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.