राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना नेत्यांचे पक्षातील इन्कमिंग आणि आउटगोइंग वाढत चालले आहे.. या पार्श्वभूमीवरच आता महाशक्ती मध्ये सक्रिय झालेले प्रहारचे बच्चू कडू यांना तोंडावर मोठा धक्का बसणार आहे..मेळघाटातील आमदार राजकुमार पटेल (Rajkumar Patel) यांनी बॅटला रामराम करत हातात धनुष्यबाण घेण्याचे संकेत दिले आहेत. राजकुमार पटेल यांच्या बैठकीचं एक पोस्टर व्हायरल होतं आहे त्यामध्ये बच्चू कडू यांचा फोटो आणि पक्षाचं नाव देखील दिसत नसल्यानं येत्या काळात बच्चू कडूंना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu), महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नेते छत्रपती संभाजीराजे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह इतर छोट्या पक्षांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीनं स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. आमदार बच्चू कडू हे परिवर्तन महाशक्तीमध्ये सक्रीय झालेले असताना त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रहारचे दोन उमेदवार विजयी झाले. बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी विधानसभा गाठली. कडूंनी सुरुवातीला शिवसेनेला पाठिंबा दिला. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री झाले. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं. कडूंनी त्यांना साथ दिली. ते महायुतीमध्ये गेले. पण गेल्याच महिन्यात त्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली. दरम्यान आता राजकुमार पटेल प्रहारला रामराम करत धनुष्यबाण हाती येणार असल्याचे चर्चांना उधाण आलं आहे.. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर बच्चू कडू यांना मोठा धक्का बसणार आहे.