राजमुद्रा : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते.. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार कंबर कसली असून भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते देखील विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात व्यस्त आहेत..एकीकडे आगामी निवडणुकीसाठी भाजपने जय्यत तयारी केलेली असतानाच पितृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र भारतीय जनता पक्षावर नाराज असल्याचीं माहिती समोर आली आहे..भाजपकडून हिंदुत्ववादी मुद्यांना बगल दिल्याने संघ नाराज असल्याचे कळते.
नुकतीच काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप पदाधिकारी यांच्यामध्ये गिरगावमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संघाच्या वरिष्ठ नेत्यांकडून दक्षिण मुंबईतील वरिष्ठ नेत्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आली. हिंदुत्वाच्या मुद्यांना बगल दिली जात असल्याचं संघाच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे. हिंदुत्वाच्या मुद्यांना प्राधान्य द्या, असे सांगत संघाच्या नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना समज दिली.
दरम्यान राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ थेट प्रचारात उतरणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. संघाने थेट विधानसभा निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरण्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा महाराष्ट्र दौरा वारंवार वाढत चालला आहे.. या पार्श्वभूमीवरच आता केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा हे देखील मुंबई कोल्हापूर आणि नाशिक दौऱ्यावर येऊन गेले…. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी आगामी निवडणुकीची रणनिती कशी असेल, काय करावे लागेल, जागावाटप या सर्व मुद्यांवर चर्चा केली. अशातच आता राष्ट्रीय स्वयं संघाच्या नाराजीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.