राजमुद्रा : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आता शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा असणाऱ्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्याकडून वेगवेगळे दसरा मेळावे घेतले जातात.. या संदर्भातच आता शिंदेंच्या शिवसेनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे..एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानावर होतोमात्र आता याचे स्थान अचानक बदलले असून मुंबईतील आझाद मैदानावर शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे..
आगामी विधानसभा निवडणूक असल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून यंदा भव्य दिव्य अशी शक्ती प्रदर्शन दसरा मेळाव्यातुन करण्यात येणार आहे.. यंदाचा दसरा मेळावा हा बीकेसीमधील एमएमआरडीए ग्राउंडमध्ये शिवसेनेचा होणार होता. पण ट्रॅफिकची समस्या उद्भवत असल्याने वाहतूक व्यवस्था लक्षात घेता अचानक हा निर्णय बदलण्यात आला आहे. त्यामुळे आझाद मैदानात मेळाव्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.त्यासाठी आझाद मैदानात सध्या भव्य असे व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे. गवत कापून मैदान साफ करण्याचे काम जोरात सुरू आहे. 50 हजार लोक बसतील इतक्या खुर्च्या सध्या आझाद मैदानामध्ये आणण्यात आलेल्या आहेत. आता या दसरा मेळाव्यातून करण्यात येणारे शक्तिप्रदर्शन आगामी विधानसभेत कितपत फायदेशीर ठरेल हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टिझर जारी करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून मेळाव्याची जोरदार तयारी केली जात आहे.दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा मेळावा आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना मोठमोठे खुलासे , दावे, आश्वासन त्यासोबतच इतर पक्षातील नेत्यांचे पक्ष प्रवेश करून विधानसभेचे रणशिंग फुंकणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..