जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेत सध्या शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांकडून भाजप गटनेता बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्या, तरी त्याला भाजप जिल्हाध्यक्षांनी विभागीय आयुक्तांना पत्र पाठवल्याने ब्रेक लागला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या व्हीप नाकारलेल्या तीस बंडखोरांनी गटनेता बदलण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्यानंतर, भाजपकडून त्याला कायदेशीर अडथळे आणण्यास प्रारंभ झाला आहे. भाजप गटनेते भगत बालाणी यांनी महापौर व विभागीय आयुक्तांना पत्र पाठविले आहे. भाजप जिल्हाध्यक्षांच्या परवानगीशिवाय गटनेता बदलण्याची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याने प्रस्ताव आल्यास रद्द करण्याची मागणी केली आहे.
भाजप गटनेत्यांच्या या पत्रामुळे पुन्हा एकदा पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली असून, शिवसेनेच्या अडचणीत कायदेशीर रित्या वाढ झाली आहे. महापालिकेतील भाजपाच्या ताब्यातील सत्ता अडीच वर्षात सेनेच्या ताब्यात जाण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या २७ नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. २७ नगरसेवकांशिवाय थेट शिवसेनेत दाखल तीन जणांविरुद्ध लवकरच अपात्रतेचा प्रस्ताव देखील दिला जाणार आहे. भाजपाच्या बंडखोर नगरसेवकांकडून भाजपची सूत्रे ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. गटनेते भगत बालाणी यांच्या जागी ऍड. दिलीप पोकळे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय बंडखोरांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. येत्या महासभेत यासंदर्भात पत्र दिले जाणार आहे. तत्पूर्वी भाजप कडून बंडखोरांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात आला आहे.
भगत बालाणी यांनी दिलेल्या पत्रानुसार भाजपाच्या घटनेत गटनेता बदलण्यासाठी प्रक्रिया निश्चित केली आहे. गटनेता बदलताना भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी गटनेता बदलाचे पत्र दिल्याशिवाय गटनेता बदलता येणार नाही. जिल्हाध्यक्षांनी पत्र न देताच गटनेता बदलल्यास ते बेकायदेशीर व घटनाबाह्य होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा राजकीय ग्रहण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि बंडखोरांना समोर आता नवा पेच निर्माण झाला आहे.