जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेत असलेल्या शिवसेनेत गटबाजीला उधाण आले आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख नियुक्तीवरून आधीच आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता महापालिकेच्या स्वीकृतसदस्यांच्या निवडीवरून जुन्या निष्ठावंत आणि नवीन शिवसैनिकात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
दरम्यान, स्वीकृत नगरसेवक पदासाठी विराज कावडीया यांचे नाव आघाडीवर असताना दुसर्या गटाकडून गजानन मालपुरे या जुन्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यावर अन्याय होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. शिवसेनेतील असंख्य कार्यकर्त्यांनी गजानन मालपुरे यांना न्याय मिळावा, त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी पक्षश्रेष्ठींनी यात लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पक्षांतर्गत हेवेदावे, गटबाजी वाढली आहे. दररोज नवनवीन प्रकरण उघडकीस येत आहे. सेनेत स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवरून पुन्हा जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. सेनेच्या वतीने विराज कावडीया, गजानन मालपुरे, दिनेश जगताप, जाकिर पठाण यांच्या नावावर चर्चा सुरू असताना अचानक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विराज कावडीया यांना पहिली संधी दिली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.
महापालिकेत सत्तांतराच्या प्रक्रियेपासून लांब राहिलेले जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याबद्दल निष्ठावंत शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या शाखा स्थापनेपासून तर पक्षसंघटनेत नवचैतन्य आणण्यापर्यंत संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी कोणतीच भूमिका बजावलेली नाही. ते जळगावात आले की एका कार्यकर्त्याच्या हॉटेलमध्ये थांबतात. त्यापलीकडे संघटना वाढीसाठी त्यांचे कुठलेच योगदान नसल्याचा आरोप केला जात आहे. ‘शिवसेनेत संघटन वाढीसाठी पालकमंत्र्यांनी आतापर्यंत कोणते प्रयत्न केले?’ असा सवाल शिवसैनिकांनी केला आहे.
शिवसैनिकांची एकही बैठक घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. स्वीकृत नगरसेवक पदाच्या उमेदवाराचे नाव देखील मुंबईवरून जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र संपर्क प्रमुखाच्या महत्त्वाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना त्यांनी सेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.
जळगाव जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी कोणत्या नेत्यांनी प्रयत्न केले याची शहानिशा, चौकशी होणे देखील आवश्यक आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सेनेच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना शासकीय समित्यांवर नियुक्त करणे अशी अपेक्षा असताना ती होत नसल्यामुळे शिवसैनिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. सध्या एरंडोल, पारोळा मतदार संघाचे शिवसेनेचे ज्येष्ठ आ. चिमणराव पाटील यांच्यासह आ. किशोर पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे या नेत्यांचे खच्चीकरण करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख यांनी भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा या तालुक्यात दौरे करून तेथील स्थानिक निष्ठावंत शिवसैनिकांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे असताना ते न केल्यामुळे सेनेत नाराजीचा सूर उमटत आहे. ‘जर स्वीकृतसदस्यासाठी निष्ठावंतांना न्याय मिळत नसेल तर, संघटना कशी वाढेल’ याचा विचार श्रेष्ठींनी करावा अशी मागणी होत आहे.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही होत आहे. ‘संपर्कप्रमुख सावंत यांनी पक्ष वाढीच्या दृष्टीने शिवसेनेत काय केले?’ असा सवाल आता होऊ लागला आहे. यापूर्वी शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाच्या नूतनीकरणावरून देखील वाद सुरु झाला होता. त्यात आता आणखी भर पडली आहे स्वीकृतसदस्य निवडीची. त्यामुळे शिवसेनेत निष्टावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे बोलले जात आहे. याकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे अशी अपेक्षा करण्यात आली आहे.