जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | मेहरूण परिसरात ३०० ब्रास इतका अवैध वाळू साठा आढळल्या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीवरून तहसीलदारांनी वाळू वाहतुकदाराला ६० लाख ७२ हजार रूपये इतक्या दंडाची नोटीस बजावण्यात आली.
मेहरूण शिवारातील रहिवासी बाळू नामदेव चाटे हे वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांच्या सर्व्हे क्रमांक २५३, प्लॉट क्रमांक ६० येथील निवासस्थानाजवळ ऑगस्ट २०१८ मध्ये मोठा वाळूसाठा असल्याचे दिसून आले होते. या प्रकरणी मेहरूणच्या तलाठ्यांनी पंचनामा केला होता. मात्र या पंचनाम्यात विसंगती असल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी महसूल खात्याकडे २१ नोव्हेंबर २०२० रोजी तक्रार केली होती.
या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात आली. यात हा वाळू साठा बाळू नामदेव चाटे यांचाच असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या चौकशीत संबंधीत साठा हा ३०० ब्रास इतका असल्याने शासकीय नियमानुसार मूल्याच्या पाच पटीने दंड ठोठावण्यात आला. याला स्वामीत्वधनाची जोड दिली असता हा दंड तब्बल ५५ लाख २० हजार इतका होतो. यावर गौणखनिजाचाच्या रॉयल्टीचे १० टक्के मूल्य लावल्यानंतरची रक्कम ही ६० लाख ७२ हजार इतकी होते. बाळू चाटे यांना याच रकमेचा दंड ठोठावण्यात आल्याचे तहसीलदारांनी बजावलेल्या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांना ही नोटीस काल ५ जुलै रोजी बजावण्यात आली असून तीन दिवसांत यावर उत्तर देण्याचे नमूद करण्यात आले आहे.