जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव महानगरपालिका भारतीय जनता पक्षाचे गटनेते भगत बालाणी यांच्या जागी ऍड. दिलीप पोकळे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय बंडखोरांच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार आज भगत रावलमल बालाणी यांची बदली करून ऍड. दिलीप बबनराव पोकळे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली असून उपगटनेते पदी चेतन गणेश सनकत यांची निवड झाली आहे.
यासंदर्भात आज महापौर जयश्री महाजन यांना पत्र देण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, नवनाथ दारकुंडे, चेतन संकत, ऍड. दिलीप पोकळे, कुंदन काळे, गोकुळ पाटील, किशोर बाविस्कर, उमेश सोनवणे
व सन्मानीय सदस्य उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या व्हीप नाकारलेल्या तीस बंडखोरांनी गटनेता बदलण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्यानंतर, भाजपकडून त्याला कायदेशीर अडथळे आणण्यास प्रारंभ झाला होता. भाजप गटनेते भगत बालाणी यांनी महापौर व विभागीय आयुक्तांना पत्रही पाठविले होते. भाजप जिल्हाध्यक्षांच्या परवानगीशिवाय गटनेता बदलण्याची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याने तसा प्रस्ताव आल्यास प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली असतांना आज हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला