राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ आली असल्याने जळगाव मध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षातील उमेदवाराकडून प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे.. या जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण कोणाला आव्हान देणार आणि या जिल्ह्याचा गड कोण राखणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिला आहे.. या मतदारसंघातील लढतीबाबत जाणून घेऊया…
जळगाव शहर मतदारसंघ : भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलीय. सुरेश भोळे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जयश्री महाजन रिंगणात आहेत. तर उमेदवारी न मिळाल्यानं शिवसेनेचे (उबाठा) कुलभूषण पाटील हे अपक्ष लढणार आहेत. इथं कुलभूषण पाटील आणि मनसेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.
जळगाव ग्रामीण मतदारसंघ : महायुतीकडून शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) गुलाबराव देवकर यांना उमेदवारी मिळाली आहे.
एरंडोल विधानसभा मतदारसंघ : एरंडोल विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अमोल चिमणराव पाटील, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) डॉ सतीश पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. तर या निवडणुकीत शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख हर्षल माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. संभाजी पाटील, भाजपाचे माजी खासदार एटी नाना पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमित पाटील हे अपक्ष म्हणून लढणार आहेत.
चोपडा विधानसभा मतदारसंघ : चोपडा विधानसभा मतदारसंघात महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे विरुद्ध शिवसेनेचे (उबाठा) प्रभाकर सोनवणे यांच्यात थेट लढत होणार आहे.
अमळनेर विधानसभा मतदारसंघ : अमळनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल पाटील, काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे, तर भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
जामनेर मतदारसंघ : जामनेरमध्ये महायुतीचे उमेदवार भाजपाचे पूर्व मंत्री गिरीश महाजन यांना भाजपानं सातव्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) दिलीप खोडपे यांना उमेदवारी मिळाली आहे. दिलीप खोडपे हे गेल्या 35 वर्षांपासून भाजपामध्ये कार्यरत होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (शरदचंद्र पवार) पक्षप्रवेश केला.
पाचोरा विधानसभा मतदारसंघ : या मतदारसंघात शिवसेनेचे किशोर पाटील आणि शिवसेनेच्या (उबाठा) वैशाली सूर्यवंशी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. तर भाजपाचे अमोल शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) माजी आमदार दिलीप वाघ हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
चाळीसगाव आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण विरुद्ध शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार उन्मेष पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी उन्मेष पाटील यांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केला होता. तर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडी तर्फे एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे आणि अपक्ष विनोद सोनवणे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.
भुसावळ आणि रावेर विधानसभा मतदारसंघ : भुसावळमध्ये भाजपाचे आमदार संजय सावकारे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे राजेश मानवतकर यांच्यात थेट लढत होणार आहे. तर रावेर मतदारसंघ भाजपाचे हरिभाऊ जावडे यांचे पुत्र अमोल जावळे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे धनंजय चौधरी, तर प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल चौधरी, वंचित बहुजन आघाडीच्या शमिभा पाटील, काँग्रेसचे (अपक्ष म्हणून लढणार) दारा मोहम्मद अशी लढत होणार आहे.