राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच मतदान नुकतच पार पडलं.. या मतदानानंतर निकालाला आता 24 तासापेक्षा कमी कालावधी उरला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आले आहेत.. त्यांनी आपल्या एका विश्वासू नेत्यावर अपक्ष उमेदवारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी सोपवली आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून सरकार बनवण्याच्या तयारीत महायुती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या विश्वासू नेत्याला जुळवाजुळव करण्यात यश मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे..
महायुती आपले सरकार बनवण्याच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागली असून त्यांच्याकडून जे पक्ष महायुतीत सामील नाहीत त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे.. विधानसभा निवडणुकीत बहुमतापासून दूर राहिल्यास महायुतीने छोट्याछोट्या पक्षांची मोट बांधायची रणनीती आखली आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही कोणत्याही अपक्षांच्या संपर्कात नसल्याचे गुरुवारी सांगितले होते. मात्र, महायुतीच्या गोटातून अपक्ष आणि बंडखोरांनी संपर्क साधण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. महायुतीचे नेते छोट्या घटकपक्षांशी बोलणी करत आहेत. केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे आता राज्यात सत्तेतील वाटा देऊन घटक पक्षांना जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती आहे.त्यांनी ही निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत दिसणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी आपल्या विश्वासू नेत्यांवर सोपवल्याची माहीती आहे.
दुसरीकडे भाजप नेते देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी पालघर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील आपल्या जवळच्या नेत्यांना सक्रिय केल्याची माहिती आहे. त्यांच्यावर भाजपला पाठिंबा देण्यासाठी अपक्ष आमदार जमवाजमवीची जबाबदारी देण्यात आली आहे.