जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | लॉकडाऊनच्या काळात मनपा प्रशासनाने हॉकर्स बांधवांचा लाखो रुपयांचा माल जप्त करून ठेवला आहे. तसेच म. फुले मार्केट मध्ये व्यवसाय करण्यास परवानगी नाही. त्यामुळे हॉकर्स बांधवांचे हाल होत आहेत. दरम्यान हॉकर्स संजय चीमरानी या व्यावसायिकाने नुकतीच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकाराने हॉकर्स बांधवांचे मनोबल खचले असून, ‘आणखी किती आत्महत्या मनपा प्रशासन पाहणार आहे?’ असा सवाल म. फुले मार्केट हॉकर्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदू पाटील आणि सचिव सचिन जोशी यांनी केला आहे.
व्यवसाय करण्यासाठी मनपा प्रशासनाने म. फुले मार्केटमध्ये परवानगी द्यावी तसेच, प्रशासनाची चाललेली ही दडपशाही व मनमानी कारभार त्वरित थांबवावा अशी मागणी करण्यात आली आहे. मनपा प्रशासनाच्या भेटीला गेल्यावर ते असहकार्याची भूमिका घेतात, असे सांगून युनियनने म्हटले की, ‘जप्त केलेला हा माल कुठल्याही परिस्थितीत देणार नाही अशी’ आडमुठी भूमिका या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
हॉकर्स बांधवांना पर्यायी जागा देण्याविषयी महापालिका अनुकूल आहे. त्यातच महात्मा फुले मार्केटच्या जागेवर व्यवसायाची मंदी चालू आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी पर्यायी जागा देऊन उपयोग नाही, असेही हॉकर्स असोसिएशनचे म्हणणे आहे. सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट अंतिम टप्प्यात आहे. शहरातील सर्व बाजार, मार्केट दुपारी चार वाजेपर्यंत खुले असतात. अशावेळी म. फुले मार्केटमध्ये हॉकर्सला पूर्वीप्रमाणे व्यवसाय करू देण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
प्रशासनाने हॉकर्स बांधवांना न्याय द्यावा अशी अपेक्षा अध्यक्ष नंदू पाटील, सचिव सचिन जोशी, हॉकर्स सादिक मनियार, बापू चौधरी, गोविंदा कुमार, शोएब शेख, भैय्या चौधरी, गुड्डू मिश्रा, राहुल शेवाळे, ज्ञानेश्वर गुजर, प्रवीण जोशी, राजू कटारिया, मनोज राणा, प्रेम कटारिया, मनोज चौधरी, राजू नन्नवरे, इरफान शेख, रवी चौधरी, रईस मणियार, शेखर वाणी, भरत पवार, गोलू गवळी, संजय जोशी, जहांगीर शेख, ऋषी पवार यांनी केली आहे.