कोरोना महामारीच्या संसर्गाविषयी जनजागृती करण्यासंदर्भात प्रयोगात्मक कलाक्षेत्रातील कलावंतांना काम देण्याबाबतची शासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. त्याअंतर्गत जिल्हा क्षेत्रावर लवकरात लवकर समिती गठीत करून कलाकार मंडळींना काम मिळावे यासाठीचे निवेदन शहरातील राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागातर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देण्यात आले.
राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कलावंतांच्या माध्यमातून कोरोना संसर्गाविषयी जनजागृती करण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा शासन निर्णय 5 मे 2019 रोजी प्राप्त झाला होता. या शासकीय निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील covid-19 कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न व लसीकरण याबाबत जनजागृती ही राज्यातील प्रयोगात्मक कला क्षेत्रातील कलावंतांच्या माध्यमातून करण्यात यावी जेणेकरून कलाकार मंडळींना कोरोना काळात काम मिळून त्यांचीही मदत केली जाईल. यासंदर्भाचे निवेदन राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागातर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना प्रत्यक्ष भेट देऊन ई-मेल द्वारे पाठवण्यात आले.
निवेदनात केलेल्या विनंतीनुसार आपल्या स्तरावरील शासन निर्णयानुरूप आपल्या जळगाव जिल्ह्याची याबाबतची समिती गठीत करून या समितीमध्ये ज्येष्ठ कलावंतांचा सहभाग करून घेऊन योग्य संस्थाना व कलाकारांना वरील शासन निर्णयाच्या आधारे विहित मुदतीत न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी जळगाव जिल्हा व सांस्कृतिक विभाग अध्यक्ष गौरव लवंगले, प्रमुख सल्लागार तथा जेष्ठ रंगकर्मी रमेश भोळे, दिग्दर्शक व कलाकार प्रदीप भोई, हनुमान सुरवसे, कलाकार गौरव मोरे, सांस्कृतिक सचिव विभावरी मोरांकर यांच्यासह रंगकर्मी उपस्थितीत होते.