मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्रात ग्रामीण भागाच्या विकासात सहकाराचे मोठे योगदान आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा सहकाराचा केंद्रबिंदू हा सध्या केंद्रीय पातळीवर पोचला असून त्याचा लाभ नक्कीच महाराष्ट्राला व अन्य राज्यांना होईल. त्यामुळे महाराष्ट्राचे सरकार सहकार अधिक बळकट होणार असल्याचा दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्याकडे आणखी एक नवी आणि मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यासंदर्भात बोलताना दरेकर यांनी सांगितले की, सहकाराचा अनुभव असलेले नेतृत्व सहकार खाते सांभाळणार आहे. गृहमंत्री अमित शहा अमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. त्यांची कार्यपद्धती उत्तम असून त्यांचा या विषयात अभ्यास चांगला आहे. मुंबई दौऱ्यावर आले होते त्यावेळी सहकारावर त्यांच्याशी चर्चा झाली.
देशभर वेगवेगळ्या प्रकारची राष्ट्रीय सहकारी फेडरेशन महामंडळे स्थापन आहेत. परंतु त्यांना स्वतंत्र असे खाते नव्हते. पण आता निश्चितपणे सहकार खात्याच्या माध्यमातून सहकार बळकटीसाठी या माध्यमातून मदत मिळणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच अमित शहा यांची भेट घेऊन सहकार चळवळ बाबत चर्चा केली. कारण राज्यातील सहकार क्षेत्रात सुरू असलेल्या घडामोडी आणि आणि सहकार क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्राचे असलेले योगदान याची माहिती दिली.