राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला बहुमत मिळाले आणि महाविकास आघाडीला पराभवाला समोर जावं लागलं.. हा पराभव आघाडीच्या नेत्यांना चांगलाच जिव्हारी लागला असून त्यांनी इव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पुन्हा मतमोजणी घेण्याची मागणी ही केली आहे.. या पार्श्वभूमीवरच आतासंपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे सोलापूरच्या माळशिरस विधानसभा क्षेत्रातील मारकडवाडी गावात आज बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार आहे. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या समर्थकांकडून ही मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र या मतदान प्रक्रियेला प्रशासनाने विरोध करत गावात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
या मतदारसंघात माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या समर्थकांनी हा निर्णय घेतला आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेऊन वास्तव समोर आणण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून ग्रामस्थांना नोटीस देण्यात आल्या असून गावात जमावबंदी लागू केली आहे.मात्र काहीही झालं तरी मतदान होणारच यावर गावचे गावकरी ठाम आहेत.. गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे..मात्र नागरिक मतदान प्रक्रियेवर ठाम आहेत. लाठीचार्ज करा किंवा गोळीबार करा, मतदान प्रक्रिया होणारच असं म्हणत नागरिकांनी निर्धार बोलून दाखवला आहे.
या माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर रिंगणात होते.. मात्र या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर 13000 मतांनी विजयी झाले. त्यांनी राम सातपुते यांचा पराभव केला.. मात्र जानकर यांना कमी मतं मिळाल्यामुळे मारकडवाडीशी ग्रामस्थ खुश नाहीत.. त्यामुळे आता ग्रामस्थांनी पुन्हा मतदान करण्याची मागणी केली आहे.. त्यामुळे या मारकडवाडीत आज मतदान प्रक्रिया पार राबवण्यावर आमदार उत्तम जानकर ठाम आहेत. निवडणूक आयोगाला आम्हाला दाखवायचे आहे की ईव्हीएम पद्धतीमध्ये घोळ आहे. असे त्यांनी म्हटले आहे.. आता या मतदानानंतर विजयाचा कौल कोणाकडे असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.