जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेत राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे भेट देऊन नगरसेवकांच्या समस्या, अडचणी ऐकून घेणार होते. परंतु वेळेअभावी ना. शिंदे येऊ शकले नाहीत. उशीर झाल्यामुळे महापालिकेतील त्यांचा हा कार्यक्रम तूर्त रद्द करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान महापालिकेच्या आवारात ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रतीक्षेत असलेले शिवसेना नेते माजी महापौर नितीन लढ्ढा प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की “महापालिकेत नवीन जुने नगरसेवकांचा कोणताही वाद नाही. सर्व नगरसेवक एकजुटीने आहेत. वेळोवेळी शिवसेनापक्षप्रमुख ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे पक्ष संघटनेचे काम सुरू राहते.” असे सांगून नितीन लढ्ढा म्हणाले “आधीच विमानतळामुळे ना. शिंदे यांना उशीर झाला. तसेच पाचोरा येथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असल्यामुळे त्यांना उशीर लागणार होता. जळगाव महापालिकेत ते फक्त धावती भेट देणार होते. शक्य होणार नसल्याने त्यांच्याशी महापौर जयश्री महाजन आणि आपण चर्चा केली. कमीत कमी एक ते दीड तास तरी द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. परंतु हे सर्व वेळेअभावी शक्य नसल्याने ना. शिंदे येऊ शकले नाहीत” असे ते म्हणाले.
शिवसेनेत कुठल्याही प्रकारचे गटातटाचे राजकारण नाही. सर्व नगरसेवक एक दिलाने, एक संघाने, एक जुटीने आहेत असेही ते म्हणाले. यावेळी नगरसेवक नितीन लढा यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. तत्पूर्वी कुसुंबा येथील विमानतळावर ना. एकनाथ शिंदे यांचे स्वागत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील तसेच नगरसेवक व शिवसैनिक उपस्थित होते.