राजमुद्रा : राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेवर आणण्यात महत्त्वाचा वाटा ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे..या योजनेचा जुलै ते नोव्हेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता डिसेंबर चा हप्ता कधी येणार याकडे लाडक्या बहिणींच लक्ष लागून राहिल होत. आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी माहिती दिली आहे. आजपासूनच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता डीबीटीद्वारे लाभार्थी महिलांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार असल्याचे तटकरे यांनी नमूद केलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीची वर्षा अखेर गोड होणार असल्याचा समोर येत आहे.
जुलै महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली, त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात. त्यानुसार गेल्या 5 महिन्यात कोट्यवधी लाभार्थी महिलाना 7500 रुपये मिळाले आहेत. आचरसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे तर या महिलांच्या खात्यात एकदमच जमा झाल्याने त्यांना 3000 रुपये एकत्र मिळाले. एवढंच नव्हे तर आमचं सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देऊ असं महायुतीतर्फे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता अर्थसंकल्पात तरतूद झाल्यानंतर लाडक्या बहिणींना नवीन वर्षापासून 2100 रुपये मिळणार असल्याचा आश्वासन देखील दिला आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ‘X’ या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवर एक ट्विट करत या योजनेबद्दल अपडेट्स दिले आहेत. ‘ महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.’ असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.