जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडणूक संदर्भात पुन्हा शिवसेना आणि भाजपात पत्रकबाजी वॉर सुरू झाले आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी शिवसेना गटनेते ॲड. दिलीप पोकळे यांनी सत्तावीस नगरसेवकांना व्हीप (पक्षादेश) जारी केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा व्हीप कायदेशीर की बेकायदेशीर? असा सवाल काही नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या निवडणुकीचे रहस्य अद्याप गुलदस्त्यात असल्याचे दिसून आले आहे. सर्वसामान्य जनतेच्या विकासकामांना प्राधान्य न देता शिवसेना या पत्रकबाजीत गुरफटलेले असल्याचे दिसून आले आहे.
प्रभाग समिती सभापती दोन ते चारच्या सभापती पदासाठी बंडखोरांसह भाजपने उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे भाजप बंडखोरांमध्येच लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. गटनेता निवडीवरून बंडखोर व भाजपात पत्रकवॉर सुरू झाले असल्याने, दोन्ही गटांकडून एकमेकांच्या कामकाजावर टीका केली जात आहे. भाजपने सत्तावीस बंडखोरांना अपात्र करण्यासाठी दाखल केलेल्या अपिलात नोटीस बजावण्यात आल्या. यात सर्व २७ नगरसेवकांना नोटीस मिळाली असून, त्याचा अहवाल देखील संबंधित अधिकाऱ्याने विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे. त्यांना सात दिवसांची मुदत खुलासा करण्यासाठी देण्यात आली असून या संबंधीचा निर्णय अद्याप न्यायप्रविष्ट आहे.
सोमवारी (ता १२) सकाळी ११ वाजता होणाऱ्या सभापती निवडणुकीत भाजप गटनेता म्हणून ॲड. दिलीप पोकळे व प्रतोद म्हणून कुलभूषण पाटील यांनी व्हीप जारी केला आहे. यात प्रभाग समिती सभापती निवडीसाठी ऑनलाइन उपस्थित रहावे असे आदेश केले आहेत. प्रभाग समिती क्र. १ सभापती पदासाठी सचिन पाटील, प्रभाग समिती क्र. २ साठी प्रवीण कोल्हे, प्रभाग समिती क्र. ३ साठी रेखा चुडामण पाटील, प्रभाग प्रभाग समिती क्र. ४ साठी शेख हसिनाबी शरीफ यांना मतदान करण्याचा पक्षाचा आदेश बजावण्यात आला आहे. पक्षादेशाचे (व्हीप) पालन न केल्यास अपात्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर भाजपाने देखील आपले उमेदवार या पदांसाठी जाहीर केले आहेत. परंतु अद्याप जारी केलेला नाही. त्यामुळे नगरसेवकांमध्ये गोंधळ उडाला आहे. मतदान कोणाला करावे? गटनेता कोण? यावरून एकमेकांकडे पाहिले जात आहे.
महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या गटनेत्यांचा व्हीप पाळला नाही म्हणून २७ बंडखोरांना अपात्रतेच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे. त्यात नुकताच बंडखोरांनी भाजप गटनेता बदलून ऍड. दिलीप पोकळे यांची निवड केली आहे. तर प्रतोद म्हणून कुलभूषण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपातील काही नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत तर्कवितर्क फिरवले जात आहे. दरम्यान पालिकेच्या चार प्रभाग समिती सभापती पैकी प्रभाग समिती एकच्या सभापतिपदी सचिन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तरीदेखील गटनेत्यांनी व्हीप बदलल्यामुळे खळबळ उडाली आहे.