राजमुद्रा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आज जयंती निमित्त मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट मेळावे घेणार आहेत. या मेळाव्यातून त्यांचं जोरदार शक्तिप्रदर्शन होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.. शिवसेना उबाठाचा अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे मेळावा होणार आहे , तर शिंदे यांच्या शिवसेनेचा वांद्रे-कुर्ला संकुलात मेळावा होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मोठ्या पराभवाला सामोर जावं लागलं.त्यानंतर आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची साथ सोडून अनेक जण शिंदेंच्या शिवसेनेत गेले.. मात्र आता या विधानसभेच्या पराभवानंतर ठाकरे गट पुन्हा एकदा जोमाने मैदानात उतरला असून निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार कंबर कसली आहे.
उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून प्रथमच सर्वसामान्य शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते विधानसभा निवडणूक निकाल आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कोणती भूमिका मांडणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान याआधी पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मध्यंतरी मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे जाहीर केले होते. मात्र, खुद्द उद्धव ठाकरे यांनी अद्याप महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
याशिवाय विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. दरम्यान आज मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात शिंदेंच्या सेनेचा की ठाकरेंचा आवाज घुमणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..