जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | गेल्या पंधरा दिवसांच्या प्रतीक्षे नंतर जळगाव जिल्ह्यात दाखल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खरिपाची पेरणी पावसाचा खंड पडल्याने वाया गेली आहे. दरम्यान शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने शेतकऱ्यांकडून खरिपाच्या दुबार पेरणीला प्रारंभ झाला आहे.
अनेक ठिकाणी शेतकर्यांनी पेरणी केली आहे. त्यात मका आणि सोयाबीन या दोन पिकांचे क्षेत्र वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. जून महिन्यात केलेली खरिपाची पेरणी पावसाचा खंड पडल्याने वाया गेलेली. यात अंकुर अवस्थेत असलेल्या पिकांवर वखरणी करून शेतकऱ्यांना पेरणी मोडण्याची वेळ आली आहे. विहित पेरणीसाठी आवश्यक असलेली ओल निर्माण झाल्याने शेतकर्यांनी पेरणीला प्रारंभ केला आहे. कापसाची लागवड करण्यास उशीर झाल्याने खरिपाची लवकर येणारे पर्यायी पीक म्हणून मका आणि सोयाबीनची कृषी विक्रेत्यांकडे विक्री होत आहे. कृषी विभागाकडून कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.