पारोळा राजमुद्रा वृत्तसेवा | आगामी निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी शिवसैनिकांनी संघटनेवर भर द्यावा, कारण संघटना मजबूत होणे आवश्यक आहे. त्याकरिता संपर्क अभियान राबवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पारोळा येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात बोलतांना केले.
पारोळा येथे संपर्क अभियान मोहीम राबवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावर आ. चिमणराव पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. हर्शल माने, यांच्यासह तालुका व परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या घणाघाती भाषणात सांगितले की, शिवसेना वाढीसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले आहे. मोठ्या कष्टाने शिवसेना जिल्ह्यात उभी राहिली आहे याची जाणीव करून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
तत्कालीन कॉंग्रेसच्या काळात मातलेले अधिकारी आणि पदाधिकारी यांना सरळ करण्याचे काम आम्ही केले असे सांगून पाटील म्हणाले, शिवसेना जिल्ह्यात कशी उभी राहिली याचे उदाहरण त्यांनी दिले. जिल्ह्यातील पहिला आमदार एरंडोल येथील होता असेही त्यांनी सांगितले. अफाट कष्ट, मेहनत, प्रामाणिक, प्रयत्न यामुळे शिवसेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या खरा पुण्याईमुळे आपण मंत्री झालो आहोत, याची जाणीव सर्वांनी ठेवावी. प्रत्येक निवडणुकीत आपण तालुक्यात, जिल्ह्यात फिरलेले आहोत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न करावा. त्यासाठी आतापासून संपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रत्येकाने संघटन कौशल्य मजबूत केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.