(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) तारादूतांनी पुकारलेल्या आंदोलनास स्वतंत्र भारत पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी वर्किंग कमिटी सदस्य डॉ. पृथ्वीराज श्रीराम पाटील यांनी पारोळा तालुक्याचे तारादूत व सारथी समन्वयक सुनील देवरे यांना पत्र दिले आहे.
स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष भगवानराव बोराडे यांच्या सूचनेनुसार हे पत्र तारादूत व सारथी समन्वयक सुनील देवरे यांना देण्यात आले असून यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे पारोळा तालुक्यातील मार्गदर्शक भिकनराव पाटील, सचिन पाटील, नितीन देसले, भरत पाटील, ईश्वर सोनवणे आदी उपस्थित होते.
सारथी संस्था समस्त मराठा-कुणबी समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी व विकासासाठी आहे. सारथी संस्थेचा आत्मा असलेला तारादूत प्रकल्प अजितदादांनी सुरु करण्याच्या सूचना देऊनही अद्यापही तारादूतांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नाहीत. छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्था सारथी पुणे अंतर्गत मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी तारादूत प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. राष्ट्रपती राजवट मध्ये प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर तारादूतांनी वेळोवेळी आंदोलनं केली. छत्रपती संभाजी राजे यांनी सुद्धा सारथी संस्थेच्या प्रमुख मागण्यांमध्ये तारादूत प्रकल्पाची मागणी केली.
19 जून रोजी अजितदादा पवार, छत्रपती संभाजी राजे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, तारादूत प्रतिनिधी व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली व अजितदादा यांनी सारथी संस्थेच्या 13 मागण्यांपैकी सारथी तारादूत प्रकल्प चालू करण्याच्या सूचना संचालक मंडळाला दिल्या. परंतू सूचना देऊन 16 दिवस उलटूनही अद्यापर्यंत प्रकल्पाबाबत कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे तारादूतांना नियुक्त्या न मिळाल्यास 15 जुलै पासून बेमुदत आत्मक्लेश आंदोलनाचा त्यांनी पवित्रा घेतला आहे.