जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्य सरकारच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना व डेल्टा संक्रमण आटोक्यात आले आहे. त्यामुळे व्यवसायिक निर्बंध संपूर्णपणे हटविण्याची मागणी राज्य कॅट तर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
गेल्या दीड वर्षापासून दीर्घकालीन लॉकडाऊनमुळे व्यापार व उद्योगांवर गंभीर परिणाम झाले आहेत. अत्यावश्यक खर्च, उपचार व औषधे खर्च, लाईट व मोबाईल बिल, व्याज, दुकान व गोडाऊन भाडे, खराब झालेला पडीक माल आदी कारणांमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत संयम ठेवणे अवघड होत आहे. सर्व परिस्थिती पाहता आता पूर्णवेळ दुकाने उघडणे आवश्यक आहे. तरी शासनाने त्वरित अध्यादेश काढून पूर्णवेळ निर्बंध उठवून दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. तसेच या मागणीचे निवेदन कॅटचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, दिलीप गांधी, प्रवीण पगारिया, जिल्हाध्यक्ष संजय शहा, रामजी सुर्यवंशी, सुभाष कासट, शंकर ललवाणी यांनी केली आहे.