(राजमुद्रा वृत्तसेवा) काँग्रेसने स्वबळाची भाषा केली असली तरी शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून नाना पटोले यांच्या स्वबळाच्या वक्तव्याला फारसं महत्त्व दिलं जात नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली असून “काँग्रेस पक्षाने जे करायचं आहे ते करावं” असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे. नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांमधील घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडी मध्ये आंतरिक धुसफूस सुरू झाली आहे.
“काँग्रेसचा अजेंडा काय आहे हे तुम्ही त्यांनाच विचारा. मी केवळ एकच सांगतो की, ‘महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आहेत. कोणी काहीही म्हणो शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वात सरकार सुरू आहे. शरद पवार हे महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत व ते यापुढेही राहतील. म्हणून बाकीची लोक काय बोलतात त्यावर आम्ही दररोज उत्तर द्यायचं, खुलासा करायचं हे मला काही योग्य वाटत नाही.” असे वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना केले.
“मला तर हे म्हणायचं आहे की, एच के पाटील हे काँग्रेसचे राज्याचे प्रभारी आहेत. त्यांनी काय सांगितलं आहे, मल्लिकार्जुन खर्गे हे त्यांचे राज्यसभेतील नेते आहेत, ते मुंबईल येऊन गेले. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आहेत.. आम्ही कुणाच्या बोलण्यावर जावं? अशाप्रकारच्या नेहमीच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत फार फरक पडत असेल, असं मला वाटत नाही. आता तो एक मीडिया इव्हेंट नक्कीच झालेला आहे. ज्याला जे करायचं आहे त्यांनी ते करावं, आम्ही एखाद्या पक्षाला बांधून थोडीचं ठेवलं आहे, ही आघाडी आहे. याशिवाय ज्या पक्षाला जे काही करायचं आहे, त्यासाठी आम्ही का उत्तर द्यावीत.” असं पटेल म्हणाले.
याचबरोबर, ”एच.के.पाटील हे प्रभारी आहेत, ते काय म्हणतात याला मी जास्त महत्व देतो. त्यामध्ये जास्त तथ्यं असतं कारण ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून ते बोलतात. एच.के.पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे तिघेही शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले होते. याचा अर्थ काय? आता इशारा तुम्हाला माहितीच आहे.” असंही यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी बोलून दाखवलं.