(राजमुद्रा वृत्तसेवा) कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने उचललेली ठोस पाऊले आणि तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी नियोजन याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिली.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी होणारी गर्दी थांबविण्यासाठी, केंद्र सरकारनेच आता त्यांच्या स्तरावरून देशपातळीवर व्यापक धोरण आणावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी, कर्नाटक बी. एस. येडियुरप्पा, केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला.
युरोपात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पूर्वेकडील देशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. हा आपल्यासाठी धोक्याचा इशाराच आहे, असं सांगतानाच कोरोनाची तिसरी लाट आपल्याही दाराशी आली आहे. त्यामुळे सावध राहा. काळजी घ्या, उपाययोजना करा, असा सतर्कतेचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
गेल्या आठवड्याभरात ८० टक्के केसेस आजच्या बैठकीत सामिल झालेल्या सहा मुख्यमंत्र्यांच्या राज्यातील आहेत. महाराष्ट्र आणि केरळातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टेस्ट, ट्रॅकिंग आणि लसीकरणावर भर दिला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.