(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरु राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, त्याचा एक परिपूर्ण आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या उद्योगाच्या आवारात करण्याची तयारी पूर्ण करावी व ज्यांना हे करणे शक्य नाही त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना सहकार्य करून अशा उद्योगांच्या कामगारांसाठी कंपन्यांच्या समन्वयातून उद्योगस्थळानजीक फिल्ड रेसिडन्शीयल एरिया निश्चित करण्यास सहकार्य करावे, कामगारांना त्यांच्या कामाच्या स्थळी जा- ये करण्यासाठी पाँईंट टू पॉईंट वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. कोणत्याही परिस्थितीत तिसरी लाट राज्यात येऊच नये यासाठी प्रयत्न करतांना दुर्देवाने तिसरी लाट आली तर राज्यातील उद्योग सुरु राहिले पाहिजेत व त्यामाध्यमातून अर्थचक्र आणि जीवनचक्र याची गती कायम राहिली पाहिले असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील काही प्रतिनिधींशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आरोग्य विभागाचे अपरमुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, आरोग्यसंचालक रामस्वामी यांच्यासह पोलीस महासंचालक संजय पांडे, सीआयआयचे पश्चिम विभागाचे चेअरमन त्यागराजन, महाराष्ट्र चेअरमन सुधीर मुतालिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.