(राजमुद्रा वृत्तसेवा) उद्यापासून (१९ जुलै) संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होणार असून संसदेच्या अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलवण्याच्या परंपरेनुसार सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती होती.
या सर्वपक्षीय बैठकीत ३३ पक्षांनी सहभाग घेतला होता. त्यात ४० हून अधिक नेते सहभागी होते. सरकारकडून विरोधकांचे मुद्दे जाणून घेण्यात आले. सत्ताधारी एनडीए पक्षांचीही बैठक पार पडणार आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासोबत चर्चा होणार आहे. तर संध्याकाळी ६ वाजता सोनिया गांधींनी काँग्रेस खासदारांची वर्च्युअल बैठक बोलावली आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी सत्ताधारी आणि विरोधीपक्षांच्या जोरदार हालचाली सुरु असल्याने उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात नेमके काय होणार याकडे सर्वांचे अलक्ष अलागून आहे. या अधिवेशनात तीन अध्यादेशांसह एकूण २३ विधेयकं पारित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यात १७ नवी विधेयकं आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधीपक्षांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या सूचना मोलाच्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ दिवस चालणार आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर संसदेचं हे पहिलं अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनात विरोधकांचा आक्रमक बाणा पाहायला मिळणार आहे. विरोधक भाजपा सरकारला इंधन दरवाढ, कोविडवरील उपाययोजना आणि लस तुटवडा, परराष्ट्र धोरण, राफेल करार या सारख्या मुद्द्यांवर घेरण्याची रणनिती आखत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षांच्या रणनितीत फेरबदल केला आहे. सोनिया गांधी यांनी दोन्ही सभागृहात कामकाज करण्यासाठी दोन गट तयार केले आहेत. हा गटाच्या माध्यमातून रणनिती आखली जाणार आहे.