(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेला येथील पिंप्राळा येथील रथ उत्सव यंदाही सलग दुसऱ्या वर्षी केवळ पाच पावले चालून भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. १४६ वर्षाची परंपरा असलेला हा रथोत्सव आहे.
विविध जयघोषाने परिसर दुमदुमला होता. कोरोना संसर्गामुळे यंदा श्री विठ्ठल मंदिर संस्थांतर्फे भजनी मंडळ विश्वस्त व उपस्थित मान्यवरांची सकाळी एंटीजेन टेस्ट करण्यात आली होती. आलेल्या भाविकांना देखील सॅनिटायझ करून नंतर दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जात होता. त्यानंतर शासकीय आदेशाचे पालन करून रथाची महापूजा व महाआरती करून रथ पाच पावले पुढे ओढून प्रातिनिधिक व साध्या स्वरूपात साजरा करण्यात आला.
श्री विठ्ठल मंदिरात पहाटे साडेपाचला विश्वस्त रुपेश विलास वाणी यांनी सपत्नीक महाअभिषेक केला. विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली. तसेच रथावरील मूर्तींची देखील विधिवत पूजा करण्यात आली. सकाळी आठ वाजता रथ उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल वाणी यांनी सपत्नीक महापूजा केली. रथाची महाआरती सकाळी स्थानिक ग्रामस्थ मंडळांनी तसेच नगरसेवक, शांतता समिती सदस्य, विश्वस्त अक्षय माने, कल्पेश वाणी, मोगरी लावणारे, स्वयंसेवक, पुजारी श्याम जोशी व भजनी मंडळ अरुण पाटील, रमेश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी माजी पोलीस पाटील विष्णू पाटील, संजय सोमाणी, शशिकांत साळवे, अतुल बारी, आबा कापसे, नगरसेवक मयुर कापसे, विजय पाटील, पुरुषोत्तम सोमाणी, पितांबर कुंभार, अध्यक्ष मोहनदास वाणी, सुनील वाणी, योगेश चंदनकर आदी उपस्थित होते.