रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | तालुक्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी काढलेल्या केळी पीकविम्याची भरपाई मिळाली असली तरीही अजूनही मोठ्या प्रमाणावर शेतकरी भरपाई मिळण्यापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी लवकरच नुकसानभरपाई मिळणार असल्याची पोकळ आश्वासने अजूनही देत आहेत. मात्र आता भरपाई मिळण्याची आशा धूसर झाली असून, या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आगामी काळात आक्रमक पाऊल उचलण्याचा इशारा उत्पादकांनी दिला.
२०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील सुमारे ४३ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी केळी पीकविमा काढला होता. तापमानाच्या उतार-चढावानुसार या शेतकऱ्यांना कमाल व किमान तापमानाची नुकसानभरपाई मिळाली. मात्र, नंतर आलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे केळीचे जे नुकसान झाले त्याची भरपाई अजूनही काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आपल्यासोबत नुकसान झालेल्या अन्य शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पण आपल्याला मिळाली नाही. विमा कंपनीचे प्रतिनिधी अजूनही तुमचे नाव भरपाईच्या यादीत आहे, भरपाई मिळेल, असे आश्वासन देत असल्याचे असंख्य शेतकऱ्यांनी सांगितले.
या संबंधित विमा कंपनीकडून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नुकसानभरपाईचा दुसरा आणि अंतिम हप्ता १९२७ शेतकऱ्यांना मिळाला आहे. आता कोणाला पुन्हा भरपाई मिळण्याची शक्यता नाही. वेगाच्या वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळीचे नुकसान झाले होते. त्या वेळी पंचनामे करताना संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी विविध त्रुटी दाखवत नुकसानभरपाईसाठी चिरीमिरीची मागणी केल्याचे आता शेतकरी खासगीत सांगत आहेत.
हेक्टरी पाच हजार रुपयांपासून मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या ५० टक्के रकमेची देवाणघेवाण शेतकऱ्यांनी केल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्या वेळी नाइलाजाने शेतकऱ्यांनी अर्थपूर्ण वाटाघाटी केल्या. मात्र तरीही अजून भरपाई मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले असून, आगामी काळात आक्रमक पाऊल उचलण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला.