जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | कोरोनाच्या महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या अडचणीविषयी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे परीक्षा संचालक के.एफ.पवार यांच्या सोबत चर्चा करून सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे त्यांना निवेदन देण्यात आले.
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या २०२०-२१ वर्षाच्या विविध शाखांच्या परीक्षामध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता आल्या नाहीत. तसेच काही विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊनही त्यांचे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर न दिसणे, निकालात त्रूटी आढळणे, परीक्षा देऊनही परीक्षेला गैरहजर दाखवणे अशा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला असून ते संभ्रमावस्थेत आहेत. यावर लवकरात लवकर विद्यार्थीहिताचा निर्णय घेण्यात यावा, सोबतच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परिपत्रक जाहीर करून विद्यार्थांच्या अडचणी दूर करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
‘ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊनही निकालामध्ये अनुउपस्थित दाखवण्यात आले आहे त्या विद्यार्थ्यांचा डेटा विद्यालयांकडे असून लवकरच त्याबद्दलचा सुधारित निकाल जाहीर करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण निकालामध्ये निकालच दिसत नाही अशा विद्यार्थ्यांना हायब्रीड (जुन्या पॅटर्न नुसार प्रवेश घेतलेले व १ वर्ष नापास झालेले.) विद्यार्थ्यांचा स्वतंत्र हायब्रीड विद्यार्थी म्हणून वेगळा निकाल लावण्यात येईल तसेच विविध शाखांच्या सर्व परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुनर्परीक्षेबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल’ असे आश्वासन विद्यापीठाकडून देण्या आले आहे.
याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येऊन विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परिपत्रक जाहीर करण्यात यावे, अन्यथा सत्यशोधक विद्यार्थी संघटनेकडून आक्रमक पाऊल उचलण्याचा इशारा सत्याशोधक विद्यार्थी संघटनेचे विकास मोरे, रोहित शिंपी व स्वप्नील गायकवाड यांनी दिला आहे.