महाड राजमुद्रा वृत्तसेवा | अतिवृष्टीमुळे दरड कोसळून हाहाकार माजलेल्या तळई गावात आज माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी प्रशासकीय मदत पोहोचण्याच्या आधीच पोहोचून लोकांना मदत कार्य सुरू केले आहे. ‘आम्ही मुंबईवरून येथे येऊ शकतो मात्र स्थानिक प्रशासन अद्याप पोहोचले का नाही?’ असा सवालही आ. महाजन यांनी केला आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
तळई गावात दरड कोसळून ७० पेक्षा जास्त नागरिक दाबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या ३६ मृतदेह आढळले असून हा आकडा वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार गिरीश महाजन हे मुंबईवरून अपघातग्रस्तांच्या भेटीसाठी निघाले. रस्त्यात अनेक अडचणी आल्या तरी आज पहाटे आ. गिरीश महाजन, आ. दरेकर, आ. निरंजन डावखरे हे तळई गावात पोहोचले. यासाठी तीन ते चार किलोमीटर पायी चालले. तेथे पोहोचल्यावर त्यांना सर्वत्र हाहाकार उडाल्याचे दिसून आले. अनेक घरांवर दरड कोसळल्याने त्यांचे अस्तित्व नाहीसे झाले होते. स्थानिक प्रशासन मात्र ढिम्म होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास एनडीआरएफचे पथक दाखल झाले. यानंतर मदत कार्य सुरू करण्यात आले. कोल्हापूर येथे २०१९ साली महापूर आल्यानंतर आ. गिरीश महाजन यांनी जिवाची पर्वा न करता मदतीसाठी धाव घेतली होती.
माध्यमांशी बोलताना आ. गिरीश महाजन म्हणाले, ‘मी प्रदीर्घ काळापासून राजकारणात असलो तरी इतकी भयंकर दुर्घटना कधी पाहिलेली नाही. तळई गावचे अस्तित्वच पुसले गेले आहे. हे गाव महाड पासून वीस किलोमीटर अंतरावर असले तरी दुर्घटना घडून गेल्यानंतर २२ तासांपर्यंत कोणीही येथे पोहोचू नये, ही लाजिरवाणी बाब आहे.’ राज्य सरकार मात्र अद्यापही झोपेतच असल्याची टीकाही आ. गिरीश महाजन यांनी केली.