जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यात काही जिल्ह्यांमध्ये सुरु असलेल्या धुवाधार पावसामुळे हतनूर धरणाच्या कॅचमेंट एरियात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. यामुळे रात्रीपासूनच धरणाचे सर्वच्या सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आल्याने धरणातून जलप्रपात बाहेर पडत आहे. त्यामुळे तापी नदीला महापूर आला आहे. दरम्यान तापी काठ परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी सदस्य सक्रिय झाले आहेत. नाशिक इगतपुरी दरम्यान कसारा घाटातील रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने अनेक गाड्या जागेवरच थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. राज्यात सिंधुदुर्ग, कोकणात अतिवृष्टी होत आहे. विदर्भातही जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे विदर्भातील नद्यांचे पाणी हतनूर धरणाच्या कॅचमेंट एरियात येत आहे. याचा परिणाम म्हणून धरणातील पाणीपातळी २०९/४९० मीटरपर्यंत पोहोचली आहे.
दरम्यान धरणात ४६.३४ टक्के जलसाठा तयर झाला आहे. धरणातून ८९ हजार ४८८ क्युसेक पाणी बाहेर पडत आहे. यामुळे तापी नदीला महापूर आला आहे. शोध बचावकार्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यासह पट्टीचे पोहणारे तयार करण्यात आले आहेत.