(राजमुद्रा जळगाव) कोरोनाच्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांप्रमाणेच कलावंत वर्ग फार मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीमुळे उपसमारीशी सामना करत आहे. मात्र आता शासनाने याची दखल घेतली असून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागा अंतर्गत 5 मे रोजी शासकीय निर्णय काढून कलावंतांना दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
या निर्णयांतर्गत शहरी तसेच ग्रामीण भागातील लोककला, एकपात्री अभिनय, एकांकिका, नाटक, पथनाट्याच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्यासाठी कलाकारांची निवड केली जात आहे. या कलाकारांना महिन्यातून किमान दहा दिवस काम मिळेल अशी तरतूद या योजनेत करण्यात आली असून याबाबतची समिती जिल्हाधिकारी कार्यालय येथे तात्काळ गठीत करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी सांस्कृतिक कला विभागाचे जिल्हाध्यक्ष गौरव लवंगले यांनी दिली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले असून अधिकाधिक कलाकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी जळगाव महानगर प्रमुख अभिषेक पाटील यांच्या वतीने केले जात आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. त्यात लसीकरण हा महत्त्वाचा भाग असून कोरोना पासून बचाव होण्यासंदर्भात प्राथमिक उपायोजना अंगीकारावे असे आवाहन करण्यात येत आहे. या बाबतीतील कोरोना विषयक समाजात जनजागृती पसरवण्यासाठी लोककला, पथनाट्य, एकपात्री अभिनय इत्यादी कला माध्यमाचा उपयोग करून बेरोजगार कलाकारांना काम देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा हा या योजनेचा उद्देश असल्याचे गौरव लवंगले यांनी सांगितले.
कलाकारांना योग्य वेळेत रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील कलाकारांच्या नावाच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले असून गौरव लवंगले यांच्यासमवेत प्रदीप भाई, गौरव मोरे, प्रमुख सल्लागार रमेश भोळे, यश महाजन, ललित पुराणिक, विभावरी मोरानकर इत्यादी मंडळी कार्यरत आहे. ज्या गरजू कलाकारांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी खालील क्रमांकांवर संपर्क करून आपले नाव नोंदवण्याचे आवाहन राष्ट्रवादी महानगर प्रमुख अभिषेक पाटील यांनी केले आहे.
संपर्क :-
गौरव लवंगले 8623067224
रमेश भोळे 9021554565