बोदवड राजमुद्रा वृत्तसेवा | बोदवड शहराला पाण्यासाठी २० ते २५ दिवस तातकळत बसावे लागत असून कधी कधी दीड महिना पिण्याचे पाणी मिळत नाही. प्रत्येक वेळी संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या कडून बोदवड वासीयांना ६ दिवसाच्या फरकाने पाणी देण्याचे दिवास्वप्न दाखवले जात असल्यामुळे भाजप बोदवड तर्फे मंगळवार (ता. ३) पासून बोदवड स्थित तहसील कचेरी समोरील गेटजवळ बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
याबाबत नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून पाणी क्रांतीला सुरुवात करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याआधीही या प्रकारचे निवेदन नायब तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सहा दिवसाआड पाणी देण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणीही करण्यात आली होती. तसे न झाल्यास तीन ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला होता. अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे बोदवड़ तालुका मिडिया प्रमुख रोहित अग्रवाल यांनी राजमुद्राला दिली.