कट्ट्यावरची चर्चा
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | गत सप्ताहात कोकणात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने जनजीवन उध्वस्त झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पूरग्रस्तांनी मदतीसाठी शासनाकडे आर्त हाक सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याठिकाणी पाहाणी दौरे सुरू केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी या भागात पाहाणी दौरे केले आहेत. परंतु, अद्याप तरी पूरग्रस्तांच्या मदतीचा ओघ संपलेला दिसून येत नाही.
नुकसानग्रस्तांना केवळ आश्वासने दिली जात आहेत. पाहिजे त्या प्रमाणात अद्याप त्यांच्याकडे सरकारची मदत पोहोचली नसल्याची ओरड होत आहे. अशातच जळगावातून मात्र मदतीचा ओघ सुरु झाला असल्याचे दिसून आले आहे. भाजप व इतर सामाजिक संस्थांतर्फे कोकणात मदत सुरू झाली आहे. जळगाव शहरातून अनेक ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू त्या ठिकाणी पोहोचविल्या जात आहेत. परंतु या वस्तू पूरग्रस्तांना मिळतीलच अशी व्यवस्था प्रशासनाने केली पाहिजे, अशी रास्त अपेक्षा जळगावकरांनी व्यक्त केली आहे.
एकीकडे कोकणात पूरग्रस्तांना मदत पोहोचवली जात असतानाच जळगाव जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये कोकणातील पुरानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कोकण, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर त्या ठिकाणी मदतीचा हात देण्यात आला. जळगावचे स्थानिक व्यापारी, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने घरगुती जीवनावश्यक वस्तूंचा साठा आणि आवश्यक प्राथमिक औषधे ट्रकच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात पोहोचवली जात आहे. दरम्यान, भाजपचे नेते आ. गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागात पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि योग्य नियोजन करून जळगावातून मदतीचा ओघ सुरू केला.
कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात सरकारवर आ. गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. “सरकार काय करत आहे? मुख्यमंत्री गेले आणि आले.. त्यांनी फक्त पाहणी केली आणि मदतीची आश्वासने दिली.” असे सांगून आ. गिरीश महाजन यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करीत आहे. अद्यापही त्याठिकाणी मदत पोहोचली नाही. तात्काळ मदत दिली पाहिजे अशी अपेक्षा असतांना तसे झाले नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगावात सेनेच्या एका कार्यक्रमात गिरीश महाजन यांच्या आरोपाला उत्तर दिले आहे. “विरोधक केवळ आरोप करत असले तरी मला राजकारण करायचे नाही. माणूस म्हणून माणसाने मदत करणे गरजेचे आहे. गिरीश महाजन यांनी त्याठिकाणी धाव घेऊन काम केले, ही चांगली गोष्ट आहे. याचे आम्ही कौतुक करतो मात्र कोरोना काळात गिरीश महाजन हे जामनेरात किती दिवस होते? हे त्यांनी सांगावे”, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
यावरून कोकणात अतिवृष्टीमुळे आलेला महापूर आणि जळगावात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेले आरोप प्रत्यारोप सध्या चर्चेचा विषय ठरत असल्याचे दिसून आले आहे.