जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक, आत्मा, जळगाव, कृषि विज्ञान केंद्र, जळगाव व रोटरी क्लब, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता रोटरी क्लब, मायादेवी नगर, महाबळ रोड, जळगाव येथे रानभाजी महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शुभहस्ते व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.
या कार्यक्रमास खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेच्या कृषि सभापती उज्वला माळके, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवा दरम्यान जिल्ह्यातील शेतकरी विविध रानभाज्या उदा. करटोली, आघाडा, पाथरी, घोळ, तांदळजा, कुर्डु, गुळवेल, शेवगा इ. विविध रानभाज्या विक्रीसाठी आणणार आहेत. रानभाजी महोत्सव तालुकास्तरावरही ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सप्ताह स्वरुपात राबविण्यात येणार आहे.
तरी इच्छुक शेतकऱ्यांनी त्यांचेकडील उपलब्ध मालाच्या तपशीलासह प्रकल्प संचालक, आत्मा, जळगाव अथवा आपले तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच जास्तीत जास्त नागरीकांनी या रानभाज्या महोत्सवात खरेदीचा आनंद घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.