जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भाजप-शिवसेनेच्या युती दरम्यान कुठेतरी शिवसेनेचा विश्वासघात झाला असून याची खात्री पटल्यावरच आम्ही इतर साथीदारांसोबत हातमिळवणी केली असल्याचे प्रतिपादन विधानसभा उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी जळगाव येथील अजिंठा विशार्म गृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
दरम्यान, शिवसेनेचे राष्ट्रवादी तसेच काँग्रेस सोबत जरी काही राजकीय मुद्द्यांबाबत राजकीय मतभेद असले तरी कुठल्याही दोन पक्षांची मते पूर्णपणे एकसारखी नसतात. मात्र असे असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा योग्य रित्या सन्मान करून आमचे राजकीय साथीदार वागतात. आम्ही कुठल्याही अधिकाऱ्यावर सूडबुद्धीने वागत नाहीत त्यामुळे जुने अधिकारी ठिकठिकाणी असले तरी आम्हाला त्यांचे सहकार्य असते असेही त्या म्हणाल्या.
विधानसभा उपसभापती नीलम ताई गोरे यांचा जळगाव दौरा नुकताच पार पडला असून अजिंठा विश्राम गृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कामकाजासंदर्भात आढावा बैठक घेऊन कोरोनाच्या अटकावासाठी सकारात्मक कार्यपद्धतीचा अनुभव समजून घेऊन त्याचा इतर भागांमध्ये अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.
चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत बोलताना नीलम ताई गोऱ्हे म्हणाल्या, राजकारणात प्रत्येक पक्षाला आपले स्वातंत्र्य असते, त्यामुळे कोणी कोणाशी भेट घ्यावी हा त्या पक्षप्रमुखांचा निर्णय असतो. राजकारणात काहीही अशक्य नसते. मात्र राजकारणात कोणीही कुणाचा कायमस्वरूपी मित्र नसतो किंवा कायमस्वरूपी शत्रू नसतो असे त्या म्हणाल्या.
दरम्यान भाजप सोबत युती होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, आम्ही सध्या त्यांच्यापासून लांब आहोत आमचे मतभेद आहेत मात्र मी आवर्जून सांगू इच्छिते की कुठेतरी शिवसेनेचा विश्वास घात झाला असून याची खात्री पटल्यावर आम्ही दुसऱ्या साथीदारांसोबत हातमिळवणी केली आहे. मात्र युती होणार की नाही यासंदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल तर ती फडणवीस सांगू शकतात.
दरम्यान, संघटन मजबूत दरम्यान जळगावात निर्माण झालेल्या नाराजी संदर्भात तसेच जिल्हाप्रमुख निवडीच्या गटबाजी संदर्भात बोलताना नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेना हा ज्वलंत आणि तडफदार लोकांचा पक्ष आहे. त्यामुळे या पक्षात मतांतर असणे विशेष नाही. गेल्या युतीच्या काळात रावसाहेब दानवे सतत आमदार फुटण्याच्या पुड्या सोडायचे मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.