राजमुद्रा वृत्तसेवा | भारतात सध्या परवानगी असलेल्या लसींमध्ये अजून एका लसीची भर पडली आहे. केंद्र सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला आपातकालीन वापराची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता भारताकडे करोनाविरोधात एकूण ५ लसी असणार आहेत. याआधी कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या लसींना भारतात वापराची परवानगी देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी यासंदर्भात ट्विटरवरून घोषणा केली आहे. “भारतानं आपली व्हॅक्सिन बास्केट वाढवली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस कोविड-१९ लसीला भारतात आपातकालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. आता भारतात करोनाविरोधात ५ लसीचा परवानगी आहे. यामुळे देशाच्या करोनाविरोधातील लढ्याला पाठबळ मिळेल”, असं ट्वीट मनसुख मांडवीय यांनी केलं आहे.
दरम्यान, भारतात परवानगी मिळालेली जॉनसन अँड जॉनसन ही पहिलीच सिंगल डोस लस असून दोनच दिवसांपूर्वी कंपनीनं केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. या लसीचा एक डोस प्रभावशाली असल्याचा कंपनीचा दावा आहे. करोनावर जॉनसन अँड जॉनसनची लस ८५ टक्के प्रभावी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. तसेच साउथ आफ्रिका आणि ब्राझील व्हेरिएंटवरही प्रभावशील असल्याचा दावा कंपनीने केला आहे.