कट्ट्यावरची चर्चा
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | बीएचआर घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार संशयित सुनील झंवरला पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुनील झंवर पोलीस पथकासमोर पोपटासारखा बोलू लागला आहे. त्यामुळे या घोटाळ्यात सहभागी असलेले अनेक मोठ्या हस्ती आणि राजकीय मंडळी, त्यांचे समर्थक, कार्यकर्ते यांच्या मोठ्या अडचणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान २७ नोव्हेंबर २०२० रोजी पोलिसांनी जळगावात छापेमारी केल्यानंतर सुनील झंवरचे घर व खान्देश मिल कॉम्प्लेक्स येथील कार्यालयातून महत्त्वपूर्ण कागदपत्रे, पुरावे जप्त केले होते. यात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या पिस्तूलचे लायसन, युजर मॅन्युअलची झेरॉक्स व इतर महत्त्वाचे कागदपत्रे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. यासंदर्भात जळगाव येथे दौऱ्यावर असलेले भाजपाचे जेष्ठ नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, बीएचआर प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. यात सहभागी असलेल्या संबंधितांना पोलिसांनी अटक केली आहे. सुनील झंवर यांचे सर्वांशी राजकीय संबंध होते हे सर्वांना ठाऊक आहे. त्याबाबत कोणीही ‘ना’ म्हणू शकत नाही. यातून जे निष्पन्न होईल ते सर्वांनाच कळेलच असेही आ गिरीश महाजन यांनी सांगितले.
आ. गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. कारण सुनील झंवर याचे जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे या प्रकरणातून अधिक काय निष्पन्न होईल हे काळच सांगणार आहे. तसेच बीएचआर घोटाळ्यात सहभागी असलेल्या लोकांशी अनेकांचे संबंध असल्याचे उघडकीस झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता या प्रकरणाचा शेवट पर्यंत पाठपुरावा करून छडा लावावा अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेने व्यक्त केली आहे. कारण बीएचआर मध्ये सर्वसामान्य जनतेच्या देखील मोठ्या प्रमाणात ठेवी अडकून पडल्या आहेत. त्या लवकरच त्यांना परत मिळाव्यात अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे पुणे येथील बीएचआरच्या मालमत्ता इतर आरोपींशी संगनमत करून कमी किमतीत खरेदी करण्यात आल्या होत्या. तसेच मालमत्ता खरेदीची संपूर्ण रक्कम रोख भरणे आवश्यक असतांना त्यांनी मुदत ठेवी बेकायदेशीरपणे वळत्या केल्या. या मालमत्ता घेतांना ज्या ठेवीदारांच्या ठेवी वर्ग झाल्या होत्या त्यांनी पैशांची मागणी केल्यानंतर संशयित सुनील झंवरने धाक दाखवून कागदपत्रांवर ठेवीदारांच्या सह्या व अंगठे घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच अपहरणासह इतर अनेक गोष्टी समोर आल्यामुळे पोलीस तपासात अनेक बाबी उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.