जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | सक्तवसुली संचालनालय (ईडीने) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बजावलेली नोटीस ही मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या चौकशीसाठी असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे जे डी सी सी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे याच मुक्ताई साखर कारखान्याच्या चेअरमन असल्याने याप्रकरणी राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावल्याने संचालक मंडळात खळबळ उडाली आहे. परंतु याबाबत कुणालाही काहीही माहिती नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नेमके कोणत्या प्रकरणाबाबत चौकशी होणार आहे याबाबत पूर्ण माहिती समोर आलेली नाही. मुक्ताई साखर कारखान्याला जळगाव जिल्हा बँकेने किती कर्ज दिले आहे याची विचारणा करण्यासाठी ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे साखर कारखान्याला कर्ज देण्याबाबत शिफारस करणाऱ्या संचालक मंडळ देखील अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या कारखान्याला जिल्हा बँकेने कर्ज देऊ नये म्हणून काहींनी यापूर्वी विरोध दर्शवला होता. परंतु त्याला न जुमानता बँकेने साखर कारखान्याला मोठ्या प्रमाणात कर्ज दिले असल्याचे समजते.
बहुचर्चित भूखंड खरेदी केल्याप्रकरणी माजी मंत्री ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे आधीच अडचणीत आले आहेत. याप्रकरणी त्यांची ईडी चौकशी झाली आहे. त्यांचे जावई गिरीश चौधरी हे ५ जुलैपासून ईडीच्या अटकेत आहेत. यानंतर खडसे आणि त्यांच्या धर्मपत्नी यांची देखील चौकशी अद्याप बाकी आहे. हे सारे घडत असताना आता त्यांचीच कन्या अध्यक्षा असणाऱ्या जेडीसीसी बँकेला त्याच अध्यक्षा असलेल्या मुक्ताई साखर कारखान्याच्या कर्जाबाबत आलेली ही नोटीस आलेल्या या नोटीस मुळे राजकीय चर्चेला राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.