जळगाव, (जिमाका) – जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेले केळीबरोबरच हळद, भेंडी या पिकांची निर्यात वाढावी, याकरीता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांच्यातर्फे वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा कक्ष, प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक 3, येथे सुरु करण्यात आलेल्या कृषिमाल निर्यात मार्गर्शन केंद्राचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्यासह तांदलवाडी, ता. रावेर येथील केळी उत्पादक प्रगतीशील शेतकरी प्रेमानंद महाजन व प्रशांत महाजन तसेच अटवाडा येथील प्रगतीशील शेतकरी विशाल अग्रवाल उपस्थित होते.
ग्रामीण भागातील शेतकरी उद्योजक व व्यावसायिक यांना निर्यातीविषयक सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयात कृषि उपसंचालक, नोडल अधिकारी निर्यात यांचे अधिनस्त कृषिमाल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात यावे, या केंद्रावर मार्गदर्शन करणेसाठी एक कृषि अधिकाऱ्याची निवड करण्याचे निर्देश कृषि आयुक्तालयाने दिले होते. त्यानुसार हे केंद्र स्थापन करण्यात आले असून याठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संजय हिंमतराव पवार, कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांचा ईमेल आयडी [email protected], [email protected] असा आहे.
या कार्यक्रमास कुर्बान तडवी, केदार थेपडे, निर्यातदार, फार्म टु टेबल ट्रेडिंग लि, संजय पवार, कृषीमाल निर्यात मार्गदर्शन केंद्राचे समन्वक यांचेसह कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. या मार्गदर्शन केंद्राचा जिल्ह्यातील निर्यातदार शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.