मुक्ताईनगर राजमुद्रा वृत्तसेवा | ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात यावे आणि याला दोषी असणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, या मागण्यांसाठी १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आ चंद्रकांत पाटील हे शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन करणार आहेत.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, सध्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यापूर्वी वरणगाव उपसा सिंचन योजने अंतर्गत असलेल्या ओझरखेड धरण पाणलोट क्षेत्रात शेतकऱ्यांचे पीक संकटात आल्याने शेतकऱ्यांनी आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. आ. चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. धरणात तातडीने पाणी सोडण्यासाठी चर्चा करण्यात आली.
पालकमंत्र्यांनी नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी कार्यकारी संचालक यांच्याशी चर्चा करून निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात आजतागायत कार्यतत्परता दाखवली नाही. दरम्यानच्या काळात मुबलक पूरस्थिती हतनूर धरणाला सुरु होती. अशा परिस्थितीत पाणी ओझरखेडा धरणात फुल फील झाले असते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे धरण कोरडेठाक होण्याच्या मार्गावर आहे.
या पाणलोट क्षेत्रातील हजारो एकर शेती व इतर पिके त्यामुळे संकटात सापडले आहेत. या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मुंबई येथे व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच धरणात पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी आ. चंद्रकांत पाटील आंदोलन करणार आहेत.